GET IN TOUCH
ADDRESS
Solapur, India, 413224
Mob: +094054 39103
Email:
shribasavarudhamahaswamijimath@gmail.com
FOLLOW US
Facebook
Instagram
Linkedin
OPENING HOURS
Mon - Sun: 24Hr
श्री ईश्वरानंद आप्पाजी
परमपूज्य सद्गुगुरु श्री बसवारूढ महास्वामीजी व परमपूज्य माता बंगारम्मा यांच्या पोटी २८ नोव्हेंबर १९३८ रोजी परमपूज्य सद्गुगुरु श्री ईश्वरानंद महास्वामीजी उर्फ आप्पाजी यांचा झालेला जन्म हा ज्ञान, अध्यात्म अन सेवेचा प्रवाह अखंडित राहण्याची नांदीच ठरली. बालपणापासूनच चिकित्सक वृत्ती असलेल्या अप्पाजींचा ओढा आध्यात्मिकतेकडे न राहिला तरच नवल ! वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी परमपूज्य सद्गुगुरु श्री बसवारूढ महास्वामीजी यांच्याकडून केवळ मुलगा नव्हे तर परमशिष्य म्हणून पूजनी अप्पाजींनी दीक्षा घेतली. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या म्हणीप्रमाणे लहानपणापासूनच पूजनीय अप्पाजींच्या तल्लख बुद्धिमत्तेची चुणूक सर्वांना येत होतीच. वयाच्या १४ व्या वर्षी 'विचार चंद्रोदय' ग्रंथ सहा महिने श्रवण करून वयाच्या १५ व्या वर्षी पूजनीय अप्पाजींनी 'वृत्ती प्रभाकर' हा ग्रंथ ऐकला. अहो म्हणतात ना, 'सद्गुरुकृपा होय जयासी, कलीकाळाचे भय नाही' .....होय, अशीच सद्गुगुरु कृपा पूजनीय सद्गुगुरु श्रोतीय ब्रह्मनिष्ठ श्री ईश्वरानंद महास्वामीजी उपाख्य आप्पाजी यांच्यावर झाली आणि त्यांनी वेद, उपनिषद, शिवनिजगुणांचे षडशास्त्र, न्यायघटित निश्चलदासांचे साहित्य, नीतिशास्त्र अशा अनेक ग्रंथांचे, धार्मिक साहित्यांचे अध्ययन, चिंतन केले. पूर्णाद्वैती असलेल्या श्री बसवारुढांचे सुपुत्र वेदांताच्या मार्गाने जाणे, हे सद्गुगुरु श्री बसवारुढांच्या साधनेचे व तपोबलाचे फलित आहे, अशी भाविकांची श्रध्दा आहे. जसे संत ज्ञानेश्वरांना मुक्ताबाई तसे श्री आप्पाजींना जेष्ठ भगिनी शिवशरणी पार्वती अक्का यांचा अध्यात्मिक साथ मिळाली.
पूजनीय अप्पाजींच्या कृपाशीर्वादाचा अखंड ओघ सोलापूरकरांवर रहावा, ही जणू त्या जगतनियंत्या परमेश्वराचीच इच्छा असावी. या परमेश्वरी इच्छेनुसार त्यांनी सध्याच्या नई जिंदगी जवळील कस्तुरबा नगर येथे एक झोपडी उभी केली. आज दिसत असलेल्या भव्य मठाची ती सुरुवात होती.
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय एका अभंगात म्हणतात, 'मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनांचे चित्त' .... लोण्याचा गोळा जसा आंतरबाह्य मृदू असतो, अगदी तसेच सज्जनांचे चित्तदेखील आंतरबाह्य कोमल असते. अशा मृदूस्वभावी, कोमलहृदयी आप्पाजींनी सोलापूर ही आपली कर्मभूमी निवडली. आणि श्री श्री श्री सद्गुगुरु बसवारूढ महास्वामीजी मठरूपी गंगोत्रीतून निघालेली ज्ञानरूपी गंगा सोलापूर शहर - जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्रात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातही खळाळू लागली.
नदी जशी आपल्या पाण्याचे मूल्य घेत नाही, चंद्र - सूर्य जसे आपल्या प्रकाशाची किंमत ठरवत नाहीत, वृक्षवेली जशी आपली फळे, फुले अगदी निस्वार्थ मनाने देऊन टाकतात अगदी त्यांचाच आदर्श घेऊन पूजनीय आप्पाजींनी हजारो गोरगरीब भुकेल्यांना अन्नदासोहाच्या माध्यमातून तृप्त केले. पोटाची भूक भागवणारे अप्पाजी भाविकांना ज्ञानाने उपाशी कसे ठेवतील ? आपल्या गुरुंकडून घेतलेले ज्ञान समाजाला सोप्या भाषेत वाटण्यातच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानणारे पूजनीय अप्पाजी पिढ्यान पिढ्यांना आदर्शवत ठरत आहेत. त्याकरिता नई जिंदगी येथील कस्तुरबा नगरात मठाची भव्य इमारत उभी करून ज्ञानार्जनाचे कार्य त्यांनी अखंडपणे सुरू ठेवले आहे.